तुटलेल्या सांध्याची गोष्ट...



एक जनरल वॉर्ड.
दारा समोरच्या तीन पलंगावर मेल
दारा शेजारच्या दोन पलंगावर फिमेल
जगण्याचे सांधे निखळलेल्या अत्यवस्थेत...

बेड न. तीन
मणक्यातून गेलेला नवरा
त्याची सुश्रा करणारी... नवीच ती
चकार शब्द न बोलता निमुटपणे
बोलणार्‍या प्रत्येक नजरांना परतवून लावत
जड पापण्यात...

बेड नं. चार
इथेही त्याची मनमानी सुरुच
हे नाही-ते नाही, हे इथे-ते तिथे
ती बेजार...
हळूच पकड असे बजावूनही
ठेवतांना पण हळूच त्याचा पाय आपटतं
बिथरलेली ती...

बेड नं. पाच
तुझ्या बापानी माझ्या आयुष्याचं
वाटोळ केलं असं म्हणत,
अधिक जोरकसपणे
मुलाला खाऊ पिऊ घालत असलेली आई...
मुलगा बाबा आल्यावर बाबांकडून
आई रितीच्या रितीच...

बेड नं. एक
हाडांनी झिजलेली आणि बसल्याजागी निखळलेली आजी
आजी जवळ तिची वहीनी
नवर्‍यामागची आस्था सांभाळत
सतत, बाई काही लागतेय का?? विचारत.
झाडपूस करणार्‍या बाईला,
-बाई किती मिळते जी एवढ्या कामाचे
२२०० रु. मंदी काय होतं बापा...
म्हणून हळहळत तिच्याही मदतीसाठी पुढे येत...

बेड नं. दोन
दोन गाड्यांच्या चकमकीत
गुढघा गमावलेली पारुल मैत्रीण
मैत्रीण मैत्रीणींशी,
- त्या फोटोग्राफर मुलीवरचा बलात्कार ... बघीतलास का?
- सगळ्या चॅनलवर तेच सुरु आहे गं!
- आता अधिकच चेकाळतील साले..
- अश्यावेळेस तर अधिकच निर्वस्त्र असल्यासारखे वाटतेय
- त्यांच्या त्या नजरा...
- माझा नवरा म्हणतो, बलात्कार बनविल्या जातात
- आणि आमचा बॉस, काय तर,
या बायकाच जातात म्हणे झ...

थरथरत टोचून घेतलेल्या सुया, लावलेल्या नळ्या,
सगळे सांधे, जखमा कण्हून कण्हून स्थिर.
पलंगा सभोवतालच्या पडद्याच्या धुक्यातील काही हरकती..
बाहेर भिंतीवर लिहलेलं...

यह अस्पताल क्लोज सर्कीट कॅमेरे का उपयोग करता है।
__________________________

काय बरं ओळ होती ती...


काय बरं ओळ होती ती...
जी भाजी चिरतांना कापल्या गेली
पोळी शेकतांना करपली
धुता धुता धुतल्या गेली
काय बरं ओळ होती ती...

जी गव्हासोबत दळल्या गेली
निवडतांना फेकल्या गेली
शिजवण्याच्या नादात गळून पडली
काय बरं ओळ होती ती...

जी घासासोबत भरवल्या गेली
जी बाहूगर्दीत निसटली
जी व्याकुळ आठवणीत चिणल्या गेली
काय बरं ओळ होती ती...

जी कि-बोर्डावर विरुन गेली
फायलींमधे हरवली
हिशेबात जास्तीची
म्हणून चालली गेली
काय बरं ओळ होती ती...

जी चहासोबत वाफवल्या गेली
कातर वेळी उदास झाली
परत परत उठून कामात हरवली
काय बर ओळ होती ती

जी सुईतील दोराखालून निसटली
वाळत काढतांना दोरीवरच राहीलीय
जी खिराडीवरील दोरीतून
सर करीत खळकण बुडाली
काय बरं ओळ होती ती...
__________________________

क्लिन अप

तिची गर्भार बोटं
माझ्या शरीरावरून फिरत होती
थेंब थेंब जुळवल्यासारखी करत
कधी सारवल्यासारखी सुध्दा...
त्या मिट्ट काळोखात
तिच्या बोटातून आत-आत
तिच्या निळ्या पिशवीतील
तिचं बाळ दिसत होतं...
आपल्या आईच्या
हात चाली सोबत
तेही मला बिलगून माझ्या चेहर्‍यावरुन
मायेनी हात फिरवत...
पण एक बोच
जे होतेय ते ठिक नाही
???
मऊ मुलाम्याचे प्रश्न
त्याची मुलाम्याची उत्तरे सुध्दा...
आत अस्वस्थता वाढलेली
एक आकांत, एक अक्रोश
आणि अंगभर शहारे
..........................
तिला मात्र माझी रोमछिद्र
मोकळी झाल्याचा रोमहर्ष...
चेहर्‍याचा गोडवा वाढायला
कडूनिंबाचे सत्त्व लावून
लेटायला सांगीतले
- पाच मिनीट
- नाही नाही दहा मिनीट जाऊ द्या...
डोळ्यावर गार पाण्याचे बोळे
सुकत चाललेली त्वचा
.
.
.
तिच बाळ
माझं सत्त्व पिऊन टाकत असलेलं...
__________________________