व्हॅल्यू एज्युकेशन


तिची परिक्षा संपली
आणि घरातल्या चारही भिंतींनी
सुटकेचा नि:श्वास टाकला
सालाबादची रीत म्हणून
आता सगळ्या वह्या पुस्तकं
तिच्या ताब्यात...
पण ताबा मिळताच दावेदाराची
बदललेली भाषा, अर्थ
...
माजघराच्या पंख्याखाली
मधोमध खुर्चीवर पाय ठेऊन बसलेली
ती;
पुस्तकाच्या गठ्ठयातून
सर्वात आधी व्हॅल्यु एज्युकेशनच्या
कोर्‍या करकरीत पुस्तकाची
कर कर कर्कश्श चाललेली चिरफाड...

__________________________

एक सफर...


वहां दिवार पर लिखा था
यह कब्रस्थान है यहां पेशाब ना करे...

दस कदम की दुरी पर
सात जन्मो के
धागों से बंधा हुआ बरगद.

पाच कदम की दुरी पर पाठशाला.

कब्रस्थानका एक भूत
बरगद पर सात धागो से बंधा
अपनी सत्तो की राह देखता,

सत्तो जो अभी सातवी कक्षा की तयारी में

न जाने अभी और कितने जनम...

__________________________

नक्टी मेली...

सुकलेल्या चेहर्‍यावरील
ओलं नाक
ताज्या मातीचं..
डकवतांना
जरास ओघळलेलं...

अपूरं लुगडं घट्ट..
घोट्याच्या वर,
कमरेला खोचलेलं...

पिवळ्या
गरसोळीच्या मापात
समोरुन खाली
उतरलेलं ब्लाऊज
जेरबंद...

पाण्याचा ट्रे घेऊन
ती वरमाय समोर...
आणि मागे बसलेल्यांन पुढे
खाली वाकून जरा अदबीने
पाणी देत...

तशी नवरीची आजी
डोक्यावरील पदर
तोंडा्शी घेत
तिच्या विश्वासूच्या
कानाला लागत

- हीला आत
पाठवू नकोस
सारखी त्या बायांच्या
गळ्याकडे पाहाते
आणि बापे हिच्या...
नक्टी मेली...
__________________________

अखेर तीन

एक...

त्याच्या मागे टाकलेल्या लाह्या...
... वार्‍याच्या अंगाने उभ्या होत
... त्याच्या मागे पळत तुटत
... आपला भुमीदाता गेला
म्हणून आक्रोश करीत...
---

दोन...

ती पार्थीवाची गाडी
मागे स्वकीयांच्या दोन चार गाड्या
पुढे अनावधानाने ट्रॅफीक जाम
..............................................
आता त्याच्या पार्थीवाच्या मागे प्रचंड गर्दी
त्याची अंतीम इच्छा
त्याच्या अंतयात्रेत सामील अनन्य लोक...
---

अखेर तीन...

खाक झालेले त्याचे निष्प्राण कलेवर
एका सोन्याच्या मनीसाठी
कालवलेल्या त्याच्या अस्थि
विसर्जनाची राख प्रदुषीत पाण्यात
...............................................
अस्थिनी प्रदुषीत झालेल्या संगमावर
कुंभ माणसाच्या गर्दीत
मुक्तीची वाट शोधत असलेला
माझा बा...
__________________________